समीर भुजबळांना मंत्रिपद देण्याच्या अटीमुळे राज्यसभेची संधी हुकल्याची चर्चा; सुनेत्रा पवारांच्या रिक्त जागेसाठी राजेंद्र जैन यांना संधी
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राज्यसभा उमेदवारीवरून सुरू असलेल्या चर्चेला अखेर पूर्णविराम मिळाला असून, पक्षाने राज्यसभेसाठी राजेंद्र जैन यांच्या नावाची अधिकृत घोषणा केली आहे. यामुळे मंत्री छगन भुजबळ यांना मोठा राजकीय धक्का बसल्याचे मानले जात आहे.
राज्यसभेच्या रिक्त जागेसाठी छगन भुजबळ यांचे नाव जवळपास निश्चित मानले जात होते. मात्र, पक्षश्रेष्ठींसमोर त्यांनी एक महत्त्वाची अट ठेवल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. सूत्रांच्या माहितीनुसार, भुजबळ यांनी राज्यसभेची उमेदवारी स्वीकारण्यापूर्वी त्यांचे पुतणे समीर भुजबळ यांना मंत्रिमंडळात स्थान देण्याची मागणी केली होती. या अटीमुळे त्यांच्या उमेदवारीवर परिणाम झाल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसने सुनेत्रा पवार यांच्या रिक्त झालेल्या राज्यसभा जागेसाठी माजी आमदार व वरिष्ठ नेते राजेंद्र जैन यांच्यावर विश्वास व्यक्त केला आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी राजेंद्र जैन यांच्या उमेदवारीची घोषणा केली.
याआधी पक्षाच्या कोअर कमिटीची बैठक तसेच वरिष्ठ नेत्यांची स्वतंत्र चर्चा झाली होती. या बैठकीत विविध नावांवर विचारविनिमय करण्यात आला. अखेर राजेंद्र जैन यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
छगन भुजबळ यांनी यापूर्वीही राज्यसभेवर जाण्याची इच्छा व्यक्त केली होती. तसेच पक्षातील इतर नेत्यांच्या कुटुंबांना मिळालेल्या संधींचा दाखला देत भुजबळ कुटुंबालाही समान न्याय मिळावा, अशी भूमिका त्यांनी मांडली होती. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सुनील तटकरे यांच्या कुटुंबीयांना पक्ष आणि सत्तेत प्रतिनिधित्व मिळाले असल्याचे उदाहरणही त्यांनी दिले होते.
दरम्यान, सुनेत्रा पवार यांच्या राज्यसभा जागेसाठी खासदार नवनीत राणा यांचेही नाव चर्चेत होते. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातून त्यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता पक्षाने फेटाळून लावली.
राजेंद्र जैन यांच्या उमेदवारीमुळे राज्यसभेच्या निवडणुकीतील राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार निश्चित झाला असला तरी, छगन भुजबळ यांच्या राजकीय भवितव्याबाबत आणि त्यांच्या पुढील भूमिकेबाबत आता राजकीय वर्तुळात उत्सुकता निर्माण झाली आहे.