आषाढी पालखी सोहळा २०२६ साठी प्रशासन सज्ज; वारकऱ्यांना अधिक सुविधा देण्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश
पुणे | प्रतिनिधी
आषाढी पालखी सोहळा-२०२६च्या पार्श्वभूमीवर पुणे विभागीय कार्यालयात उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली. यावेळी वारकऱ्यांना अधिकाधिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने कार्य करावे, असे निर्देश त्यांनी दिले.
महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री विठ्ठलाच्या आषाढी एकादशीसाठी आळंदी येथून संत ज्ञानेश्वर महाराज, देहू येथून संत तुकाराम महाराज तसेच सासवड येथील संत सोपानकाका यांच्या पालख्यांसह राज्यातील विविध संतांच्या पालख्या पुणे विभागातून मार्गक्रमण करतात. या ऐतिहासिक आणि आध्यात्मिक परंपरेला साजेसा, सुरक्षित व सुविधायुक्त पालखी सोहळा आयोजित करण्यासाठी प्रशासनाने विशेष तयारी करावी, असे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सांगितले.
यावेळी त्या म्हणाल्या की, आषाढी वारी ही महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरेचा मानबिंदू आहे. दरवर्षी लाखो वारकरी पांडुरंगाच्या दर्शनासाठी पंढरपूरकडे प्रस्थान करतात. त्यामुळे प्रत्येक वारकऱ्याला सुरक्षित, स्वच्छ आणि दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. पालखी प्रमुख, विश्वस्त आणि दिंडी प्रमुखांनी बैठकीत मांडलेल्या अडचणी व सूचनांवर आवश्यक ती कार्यवाही केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
पालखी सोहळा विश्वस्त, दिंडी प्रमुख आणि स्थानिक प्रशासन यांच्यात सातत्यपूर्ण संवाद आणि समन्वय राहिल्यास सोहळा अधिक यशस्वी होईल, असा विश्वास व्यक्त करताना त्यांनी पुणे, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यांतील सर्व यंत्रणांनी एकत्रितपणे नियोजन करून वारकऱ्यांची कोणतीही गैरसोय होणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना दिल्या.
बैठकीस पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विरधवल जगदाळे, पुणे शहराच्या महापौर मंजुषा नागपुरे, पिंपरी-चिंचवडचे महापौर रवी लांडगे, विभागीय आयुक्त शितल तेली-उगले, महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशनचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर, पुणे शहरचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पिंपरी-चिंचवड शहरचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, पुणे महानगरपालिकेचे आयुक्त नवल किशोर राम, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
तसेच पालखी सोहळ्याशी संबंधित प्रमुख विश्वस्त, पालखी प्रमुख तसेच सातारा आणि सोलापूर जिल्ह्यांतील जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठकीत सहभागी झाले होते.
यंदाच्या आषाढी पालखी सोहळ्यात वारकऱ्यांसाठी पाणी, स्वच्छता, आरोग्य सेवा, सुरक्षा व्यवस्था, वाहतूक नियोजन आणि निवास सुविधा यावर विशेष भर दिला जाणार असून प्रशासनाकडून व्यापक तयारी सुरू असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.
ANN – Accurate News Network
🟥 Truth First | Fast & Accurate Reporting
🌍 महाराष्ट्र तसेच भारत आणि जगभरातील ताज्या घडामोडी आता एका विश्वासार्ह प्लॅटफॉर्मवर.
ANN – Accurate News Network घेऊन येत आहे:
✔ Breaking News
✔ Political Updates
✔ Crime Reports
✔ Social & Viral Stories
✔ Entertainment & Sports
✔ Ground Reporting
✔ Live Updates