पंतप्रधान मोदींकडून मदतीची घोषणा; मृतांच्या वारसांना १० लाखांची मदत जाहीर
सुरत/जळगाव : गुजरातमधील सुरत जिल्ह्यात झालेल्या दोन एसटी बसेसच्या भीषण अपघातात चालकांसह सात जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या भीषण दुर्घटनेत अनेक प्रवासी गंभीर जखमी झाले असून मृतदेह पूर्णपणे जळाल्यामुळे त्यांची ओळख पटवण्यासाठी डीएनए नमुने घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
सुरत जिल्ह्यातील बारडोली तालुक्यातील उवा गावाजवळ हा भीषण अपघात घडला. धुळे-सुरत मार्गावरील एसटी बस (एमएच-18 बीझेड 1258) गुजरात हद्दीतून प्रवास करत असताना मागून भरधाव येणाऱ्या ट्रकने तिला जोरदार धडक दिली. धडकेमुळे बस रस्त्यावरील दुभाजक तोडून विरुद्ध मार्गावर गेली.
याचवेळी जामनेर-सुरत मार्गावरील दुसरी एसटी बस (एमएच-20 बीएल 3360) समोरून येत होती. दोन्ही वाहनांची जोरदार टक्कर झाल्यानंतर एक बस रस्त्याच्या खाली घसरली आणि अचानक आग लागली. काही क्षणांतच आगीने भीषण रूप धारण केल्याने अनेक प्रवासी बसमध्ये अडकले.
चालकांसह सात जणांचा मृत्यू
या दुर्घटनेत दोन्ही बस चालकांचा मृत्यू झाला असून पाच ते सहा प्रवासी होरपळून मृत्युमुखी पडल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. चार ते पाच प्रवासी गंभीर भाजले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
जामनेर आगारातील बसचे चालक घनश्याम बरकले यांचा अपघातात मृत्यू झाल्याची माहिती जळगाव जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी दिली. काही जखमी प्रवाशांची प्रकृती चिंताजनक असल्याचेही सांगण्यात आले आहे.
मृतदेह जळाल्याने ओळख पटवण्याचे आव्हान
अपघातातील काही मृतदेह इतके जळाले आहेत की त्यांची ओळख पटवणे अवघड झाले आहे. त्यामुळे संबंधित मृतांच्या डीएनए नमुन्यांची तपासणी करून ओळख निश्चित करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी सांगितले की, मृत आणि जखमी व्यक्तींची संपूर्ण माहिती मिळवण्यासाठी सुरत प्रशासनाशी सातत्याने संपर्क ठेवण्यात येत आहे. तसेच जळगाव जिल्ह्यातील नागरिकांना मदत करण्यासाठी विशेष पथक सुरतला रवाना करण्यात आले आहे.
पंतप्रधान मोदींकडून शोक व्यक्त
या दुर्घटनेबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. मृतांच्या कुटुंबीयांप्रती सहवेदना व्यक्त करत त्यांनी जखमींना लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून (PMNRF) मृतांच्या वारसांना प्रत्येकी २ लाख रुपये आणि जखमींना ५० हजार रुपयांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे.
<blockquote class=”twitter-tweet”><p lang=”en” dir=”ltr”>Deeply pained to hear about a mishap in Surat district, Gujarat. My condolences to those who have lost their loved ones. May the injured recover at the earliest. Rescue operations are underway and authorities are providing all possible assistance at the accident site. <br><br>An…</p>— PMO India (@PMOIndia) <a href=”https://x.com/PMOIndia/status/2061803300039881163?ref_src=twsrc%5Etfw”>June 2, 2026</a></blockquote> <script async src=”https://platform.x.com/widgets.js” charset=”utf-8″></script>
मृतांच्या वारसांना १० लाखांची मदत
राज्याचे परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनीही दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी १० लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. तसेच सर्व जखमींवर मोफत आणि सर्वोत्तम वैद्यकीय उपचार करण्याचे निर्देश देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
अफवांवर विश्वास ठेवू नका
दरम्यान, प्रशासनाने नागरिकांना अपघातासंदर्भात कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे. अधिकृत माहितीची प्रतीक्षा करून जबाबदारीने वागावे, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.