एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनंतर जुईली दळवींची माघार; शिवसेनेतील अंतर्गत नाराजी पुन्हा चर्चेत
रायगड : कोकण विधान परिषद निवडणुकीत मोठी राजकीय घडामोड घडली असून आमदार महेंद्र दळवी यांच्या कन्या जुईली दळवी यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनंतर हा निर्णय घेण्यात आला. मात्र, त्यानंतर महेंद्र दळवी यांनी सोशल मीडियावर केलेल्या भावनिक पोस्टमुळे शिवसेनेतील अंतर्गत नाराजी पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरली आहे.
रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील विधान परिषद निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. महायुतीत ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडे गेल्यानंतर सुनिल तटकरे यांचे पुत्र अनिकेत तटकरे यांना उमेदवारी देण्यात आली होती. मात्र, त्याच मतदारसंघातून शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवी यांच्या कन्या जुईली दळवी यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता.
“माझा संघर्ष व्यक्तीविरोधात नव्हता”
अर्ज मागे घेतल्यानंतर महेंद्र दळवी यांनी सोशल मीडियावर भावना व्यक्त करत म्हटले की, “माझा संघर्ष कुणा व्यक्तीविरोधात नव्हता, तर कोकणच्या विकासासाठी आणि सामान्य जनतेच्या हक्कांसाठी होता.”
ते पुढे म्हणाले, “माझ्या राजकीय प्रवासात एका राजकीय पर्वाचा अंत मी स्वतः केला होता. आज दुसऱ्या एका राजकीय पर्वाचा अंत झाला असता. मात्र कोकणातील माझ्याच काही नेत्यांनी माझा आत्मविश्वास कमी करण्याचा प्रयत्न केला.”
शिंदे यांच्या आदेशाचा मान
महेंद्र दळवी यांनी पोस्टमध्ये स्पष्ट केले की, पक्षशिस्त आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाचा मान राखत उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला.
“आजचा दिवस कोकणवासीयांचा नसला तरी उद्याचा सूर्योदय नक्कीच कोकणवासीयांसाठी असेल,” असेही त्यांनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केले.
अनिकेत तटकरे यांच्यावरील विरोध मावळला
जुईली दळवी यांच्या उमेदवारीमुळे महायुतीतील अंतर्गत मतभेद उघड झाले होते. मात्र अर्ज मागे घेतल्यानंतर अनिकेत तटकरे यांच्या उमेदवारीला असलेला शिवसेनेतील विरोध मोठ्या प्रमाणात मावळल्याचे चित्र दिसत आहे.
जुईली दळवी यांची तब्येत ठीक नसल्यामुळे त्या अर्ज मागे घेण्यासाठी प्रत्यक्ष उपस्थित राहू शकल्या नाहीत. त्यांच्या वतीने सूचक विघ्नेश माळी यांनी अर्ज मागे घेतला. यावेळी आमदार भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले उपस्थित होते.
कोकणातील राजकारण पुन्हा चर्चेत
महेंद्र दळवी यांच्या भावनिक पोस्टमुळे कोकणातील शिवसेनेतील अंतर्गत धुसफूस अद्याप कायम असल्याची चर्चा रंगली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका आणि कोकणातील राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर या घडामोडींना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
ANN – Accurate News Network
🟥 Truth First | Fast & Accurate Reporting
🌍 महाराष्ट्र तसेच भारत आणि जगभरातील ताज्या घडामोडी आता एका विश्वासार्ह प्लॅटफॉर्मवर.
ANN – Accurate News Network घेऊन येत आहे:
✔ Breaking News
✔ Political Updates
✔ Crime Reports
✔ Social & Viral Stories
✔ Entertainment & Sports
✔ Ground Reporting
✔ Live Updates






