शेतकऱ्याकडून 5 हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात अटक; महसूल विभागात खळबळ
धुळे : धुळे तहसील कार्यालयातील पुरवठा निरीक्षक तथा शासकीय गोदाम व्यवस्थापकाला 5 हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहात पकडले आहे. मनिष महेश बागुल (वय 30) असे अटक करण्यात आलेल्या अधिकाऱ्याचे नाव असून या कारवाईमुळे धुळे महसूल विभागात एकच खळबळ उडाली आहे.
ऑनलाइन बिल प्रक्रिया सुरळीत करण्यासाठी आणि ज्वारीचा दर्जा चांगला दाखवण्यासाठी शेतकऱ्याकडे लाचेची मागणी केल्याप्रकरणी एसीबीने ही कारवाई केली. आरोपीविरुद्ध धुळे शहर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ज्वारी खरेदी प्रक्रियेत अडथळ्याची धमकी
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार शेतकरी हे धुळे तालुक्यातील अंचाडे गावचे रहिवासी आहेत. त्यांनी आणि त्यांच्या पत्नीने पिकवलेली ज्वारी शासनाच्या किमान आधारभूत किंमत (MSP) योजनेअंतर्गत विक्रीसाठी ऑनलाइन नोंदणी केली होती.
शासकीय गोदामात ज्वारीची मोजणी झाल्यानंतर पुरवठा निरीक्षक मनिष बागुल याने शेतकऱ्याला बाजूला बोलावून ज्वारीचा दर्जा चांगला दाखवण्यासाठी आणि ऑनलाइन बिल प्रक्रियेत कोणताही अडथळा येऊ नये यासाठी 5 हजार रुपयांची लाच मागितली. लाच न दिल्यास बिल प्रक्रिया पुढे जाणार नाही, अशी धमकीही त्याने दिल्याचा आरोप आहे.
शेतकऱ्याची एसीबीकडे तक्रार
शासकीय कामासाठी लाच देण्यास नकार देत शेतकऱ्याने थेट एसीबी कार्यालय गाठून तक्रार दाखल केली. तक्रारीनंतर एसीबीच्या पथकाने पडताळणी केली असता आरोपी अधिकाऱ्याने पंचांसमक्ष लाचेची मागणी केल्याचे स्पष्ट झाले.
सापळा रचून रंगेहात अटक
लाचेची मागणी सिद्ध झाल्यानंतर एसीबीने शासकीय गोदामात सापळा रचला. ठरल्याप्रमाणे तक्रारदार शेतकरी पैसे देण्यासाठी गेल्यानंतर मनिष बागुल याने 5 हजार रुपयांची लाचेची रक्कम स्वीकारली. त्याचवेळी दबा धरून बसलेल्या एसीबीच्या अधिकाऱ्यांनी झडप घालून त्याला रंगेहात पकडले.
शेतकऱ्यांच्या अडवणुकीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर
या कारवाईमुळे शासकीय खरेदी केंद्रांवर शेतकऱ्यांची होणारी अडवणूक आणि भ्रष्टाचाराचा मुद्दा पुन्हा एकदा समोर आला आहे. एसीबीकडून पुढील तपास सुरू असून आरोपी अधिकाऱ्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे.