कणकवली | प्रतिनिधी
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली रेल्वे स्थानकावरील प्रवाशांच्या सुविधांमध्ये मोठी भर पडणार आहे. मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकासमंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या पाठपुराव्यामुळे स्थानकातील सरकता जिना (Escalator) प्रवाशांच्या सेवेत दाखल झाला असून प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वर नवीन शेड उभारण्यासही मंजुरी मिळाली आहे.
कोकण रेल्वे मार्गावरील कणकवली हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महत्त्वाचे रेल्वे स्थानक मानले जाते. प्रवाशांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पालकमंत्री नितेश राणे यांनी कोकण रेल्वे प्रशासनासोबत बैठका घेत विविध मागण्या मांडल्या होत्या. त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर या कामांना गती मिळाली आहे.
सरकता जिना प्रवाशांच्या सेवेत
गेल्या महिन्यात पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते सरकत्या जिन्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला होता. अवघ्या काही दिवसांत हे काम पूर्ण करण्यात आले असून आता प्रवाशांसाठी जिना खुला करण्यात आला आहे.
या प्रकल्पासाठी सुमारे 68 लाख रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. ताशी सुमारे 6 हजार प्रवाशांची वाहतूक क्षमता या सरकत्या जिन्याची असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली.
प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वर 160 मीटर लांबीचे शेड
प्रवाशांना पावसाळा आणि उन्हाळ्यात संरक्षण मिळावे यासाठी प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वर 160 मीटर लांबीच्या नव्या शेडची उभारणी करण्यात येणार आहे.
या प्रकल्पासाठी अंदाजे 75 लाख रुपयांचा खर्च अपेक्षित असून लवकरच कामाचा शुभारंभ करण्यात येणार आहे. हे कामही तातडीने पूर्ण करण्यात येईल, असा विश्वास कोकण रेल्वे अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
प्रवाशांकडून समाधान
सरकता जिना आणि नवीन शेड या दोन महत्त्वाच्या सुविधा मंजूर झाल्यामुळे कणकवलीसह सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. विशेषतः ज्येष्ठ नागरिक, महिला आणि दिव्यांग प्रवाशांना या सुविधांचा मोठा फायदा होणार आहे.