ठाकरे गटाने उमेदवार न देण्याचा निर्णय योग्य; भाजप बंडखोरांना पाठिंबा देण्याच्या चर्चांनाही मिळाले बळ
नाशिक : विधान परिषदेच्या नाशिक स्थानिक प्राधिकरण मतदारसंघाच्या निवडणुकीत ठाकरे गटाने उमेदवार न दिल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे. या पार्श्वभूमीवर खासदार संजय राऊत यांनी पक्षाच्या निर्णयाचे समर्थन करत शिवसेना (एकनाथ शिंदे) गट हा आमचा पहिल्या क्रमांकाचा शत्रू असल्याचे स्पष्ट वक्तव्य केले.
नाशिक दौऱ्यावर असताना प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना राऊत म्हणाले की, नाशिक मतदारसंघातील निवडणूक सुरुवातीपासूनच एकतर्फी दिसत होती. महायुती आणि महाविकास आघाडीच्या मतदारसंख्येत मोठी तफावत असल्याने पक्षातील इच्छुकांमध्येही निवडणूक लढविण्याबाबत उत्साह दिसून आला नाही.
उमेदवार न देण्याचा निर्णय योग्य
वसंत गिते आणि अनिल कदम यांनी पक्षाच्या सूचनेनुसार उमेदवारी अर्ज घेतले होते. मात्र अर्ज घेणे आणि प्रत्यक्ष निवडणूक लढविण्याची तयारी असणे यात फरक आहे. अपेक्षित उत्साह उमेदवारांकडून दिसला नाही. त्यामुळे उमेदवार न देण्याचा निर्णय घेण्यात आला, असे राऊत यांनी स्पष्ट केले.
ते म्हणाले, “आमच्याकडे 100 पेक्षा अधिक मतदार असते तर आम्ही नक्कीच निवडणूक लढवली असती. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करूनच हा निर्णय घेण्यात आला आहे.”
भाजप बंडखोरांना पाठिंब्याची चर्चा
नाशिकमध्ये शिवसेना शिंदे गटाला रोखण्यासाठी ठाकरे गट भाजपच्या बंडखोर उमेदवारांना अप्रत्यक्ष पाठिंबा देणार असल्याची चर्चा सुरू आहे. याबाबत विचारले असता संजय राऊत यांनी “निकालाच्या वेळी सर्व स्पष्ट होईल” असे सांगत थेट उत्तर टाळले.
मात्र याचवेळी त्यांनी, “भाजप हा काही दानशूर किंवा पवित्र पक्ष नाही. पण महाराष्ट्रात आमचा पहिल्या क्रमांकाचा राजकीय शत्रू शिवसेना शिंदे गटच आहे,” असे स्पष्टपणे म्हटले.
घोडेबाजाराच्या आरोपांवर सहमती
विधान परिषदेच्या निवडणुकांमध्ये मोठ्या प्रमाणावर आर्थिक व्यवहार होत असल्याच्या आरोपांवरही राऊत यांनी भाष्य केले. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आमदार रोहित पवार यांनी केलेल्या आरोपांशी सहमती दर्शवत त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये घोडेबाजार होत असल्याचा दावा केला.
“अनेक चांगल्या कार्यकर्त्यांना अशा निवडणुकांपासून दूर राहावे लागते. नाशिकमध्येही सर्वांना घोडेबाजार म्हणजे काय हे समजेल,” असे सूचक वक्तव्य त्यांनी केले.
राजकीय चर्चांना उधाण
संजय राऊत यांच्या वक्तव्यानंतर नाशिक विधान परिषद निवडणुकीत ठाकरे गटाची नेमकी भूमिका काय राहणार, याबाबत नव्याने चर्चा सुरू झाली आहे. विशेषतः भाजप बंडखोर उमेदवारांना अप्रत्यक्ष पाठिंबा मिळण्याची शक्यता व्यक्त होत असल्याने आगामी मतदान आणि निकालाकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.