टीसीएस धर्मांतरण प्रकरणाला राजकीय वळण; निदा खानला संभाजीनगरमध्ये आश्रय दिल्याचा गंभीर आरोप
छत्रपती संभाजीनगर : नाशिकमधील टीसीएस (TCS) धर्मांतरण प्रकरणाला आता मोठे राजकीय वळण मिळाले आहे. राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी या प्रकरणातील मुख्य संशयित निदा खानला छत्रपती संभाजीनगरमध्ये लपवून ठेवण्यात आल्याचा आरोप करत एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या चौकशीची मागणी केली आहे.
माध्यमांशी संवाद साधताना शिरसाट म्हणाले की, निदा खान प्रकरण अत्यंत गंभीर असून त्यामागे अनेक धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता आहे. “हे केवळ धर्मांतरणाचे प्रकरण नसून लव्ह जिहाद, जबरदस्तीचे विवाह आणि अशा कारवायांसाठी होणाऱ्या आर्थिक पुरवठ्याशी संबंधित मोठे रॅकेट असू शकते,” असा दावा त्यांनी केला.
‘निदा खान एकटी इतके मोठे काम करू शकत नाही’
संजय शिरसाट यांनी दावा केला की, नाशिकमध्ये गुन्हा उघडकीस आल्यानंतर निदा खान प्रथम मुंब्रा येथे गेली आणि त्यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये आली. तेथे तिला जाणीवपूर्वक आश्रय देण्यात आल्याचा संशय असल्याचे त्यांनी म्हटले.
“गुन्हेगाराला आश्रय देणे किंवा पोलिसांपासून लपवून ठेवणे हा देखील गंभीर गुन्हा आहे. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी होणे आवश्यक आहे,” असे शिरसाट म्हणाले.
इम्तियाज जलील यांच्या चौकशीची मागणी
या प्रकरणात एमआयएमचे नगरसेवक मतीन पटेल यांचे नाव समोर आले असून चौकशीदरम्यान त्यांनी इम्तियाज जलील यांचे नाव घेतल्याचा दावा शिरसाट यांनी केला. त्यामुळे पोलिसांनी एफआयआरच्या आधारे इम्तियाज जलील यांचीही चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली.
तसेच या संदर्भात आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली असून दोषींना कोणतीही सवलत दिली जाणार नाही, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याचेही त्यांनी सांगितले.
एसआयटीचा तपास वेगात
दरम्यान, या संवेदनशील प्रकरणाच्या तपासासाठी स्थापन करण्यात आलेल्या विशेष तपास पथकाकडून (SIT) तपासाला वेग देण्यात आला आहे. निदा खानला आश्रय दिल्याचा आरोप असलेल्या एमआयएमचे नगरसेवक मतीन पटेल यांचा मोबाईल फोन जप्त करण्यात आला आहे.
तांत्रिक विभागाच्या मदतीने मोबाईलमधील जुना डेटा आणि कॉल रेकॉर्ड्स पुनर्प्राप्त करण्याचे काम सुरू असून तपासातून काही महत्त्वाचे धागेदोरे समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
मतीन पटेल पुन्हा चौकशीसाठी हजर होणार
मिळालेल्या माहितीनुसार, मतीन पटेल यांची यापूर्वी दोन वेळा चौकशी करण्यात आली असून तपासाच्या पुढील टप्प्यासाठी त्यांना पुन्हा नाशिक पोलिसांसमोर हजर राहावे लागणार आहे.
या प्रकरणात पुढे कोणती नवी माहिती समोर येते, एसआयटी तपासातून कोणते धागेदोरे उलगडतात आणि इम्तियाज जलील यांच्याबाबत काय निर्णय घेतला जातो, याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.