राहाता | प्रतिनिधी
नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गावर प्रवाशांची लूटमार आणि मालवाहू वाहनांमधून डिझेल चोरी करणाऱ्या टोळीचा महामार्ग पोलिसांनी थरारक पाठलाग करून पर्दाफाश केला. या कारवाईदरम्यान आरोपींनी पोलिसांच्या वाहनावर दगडफेक केली. पोलिसांनी एका आरोपीला अटक केली असून त्याचे सहा साथीदार फरार झाले आहेत.
अमोल नाना वैद्य (वय 20, रा. कोऱ्हाळे, ता. राहाता) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. कोपरगाव न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, समृद्धी महामार्गावरील चॅनेल क्रमांक 508 जवळ बंद पडलेल्या वाहनातील प्रवाशांची लूटमार सुरू असल्याची माहिती नियंत्रण कक्षाकडून बाभळेश्वर महामार्ग पोलिसांना मिळाली. घटनास्थळी पोहोचताच आरोपी दोन वाहनांमधून पसार झाले.
चॅनेल क्रमांक 510 जवळ संशयित वाहन दिसताच पोलिसांनी पाठलाग सुरू केला. यावेळी आरोपींनी पोलिसांच्या वाहनावर चालत्या गाडीतून जोरदार दगडफेक केली. तसेच दुसऱ्या वाहनाच्या मदतीने पोलिसांचा मार्ग अडवण्याचाही प्रयत्न केला. या गोंधळात एक वाहन पसार झाले, तर दुसरे वाहन चुकीच्या दिशेने भरधाव वेगाने पळाले.
दरम्यान, सकाळी एका ट्रक चालकाला मारहाण करून लुटल्याची माहिती पोलिसांना मिळाली. तपासात हे कृत्यही त्याच टोळीने केल्याचे उघड झाले. त्यानंतर पोलिसांनी शोधमोहीम तीव्र केली असता चॅनेल क्रमांक 520 जवळ आरोपी मालवाहू ट्रकमधून डिझेल चोरी करताना आढळले.
पोलिसांना पाहताच आरोपींनी पुन्हा वेगाने पळ काढला. अखेर कोपरगाव तालुक्यातील धोत्रे शिवार परिसरात आरोपींनी वाहन सोडून शेतात धाव घेतली. पोलिसांनीही जीवाची पर्वा न करता पाठलाग करत एका आरोपीला पकडण्यात यश मिळवले.
कारवाईदरम्यान पोलिसांनी आरोपींच्या ताब्यातील वाहन, घातक शस्त्रे तसेच सुमारे 385 लिटर डिझेलने भरलेले 11 कॅन जप्त केले. फरार आरोपींचा शोध सुरू असून पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई बाभळेश्वर महामार्ग पोलीस केंद्राचे पोलीस उपनिरीक्षक विक्रांत कचरे आणि त्यांच्या पथकाने केली.