नाशिकमध्ये नरेंद्र दराडे विरुद्ध गोकुळ गीते सामना; राज्यभरात अर्ज माघारीनंतर निवडणुकीचे चित्र स्पष्ट
मुंबई, प्रतिनिधी : महाराष्ट्र विधानपरिषदेच्या स्थानिक स्वराज संस्था मतदारसंघाच्या 17 जागांसाठी सुरू असलेल्या निवडणूक प्रक्रियेत उमेदवारी अर्ज माघारीच्या अंतिम दिवशी मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या. राज्यातील 17 पैकी 5 जागा बिनविरोध झाल्या असून उर्वरित 12 मतदारसंघांत महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात थेट लढती रंगणार आहेत.
अर्ज माघारीच्या दिवशी अनेक ठिकाणी राजकीय समीकरणे बदलली. काही ठिकाणी महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी संख्याबळाचा अभाव आणि मित्रपक्षांचे अपुरे सहकार्य यामुळे माघार घेतली, तर महायुतीनेही बंडखोरांना शांत करण्यात यश मिळवले. परिणामी अनेक मतदारसंघांतील चित्र अंतिम टप्प्यात स्पष्ट झाले आहे.
राज्यातील पाच जागांवर उमेदवार बिनविरोध विजयी झाले आहेत. यामध्ये वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली मतदारसंघातून भाजपचे अरुण लखानी, पुण्यातून राष्ट्रवादी काँग्रेसचे विक्रम काकडे, ठाण्यातून शिवसेनेचे रवींद्र फाटक, रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्गमधून राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिकेत तटकरे आणि यवतमाळमधून शिवसेनेचे दुष्यंत चतुर्वेदी यांचा समावेश आहे.
नाशिक मतदारसंघाकडे राज्याचे विशेष लक्ष लागले आहे. शिवसेनेचे नरेंद्र दराडे यांच्या विरोधात अपक्ष उमेदवार गोकुळ गीते मैदानात उतरले असून या लढतीची सर्वाधिक चर्चा सुरू आहे. भाजपचे गणेश गीते यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने नाशिकमधील समीकरणे बदलली आहेत.
सांगली-सातारा, जळगाव, नांदेड, सोलापूर, नागपूर, अमरावती, भंडारा-गोंदिया, धाराशिव-लातूर-बीड, परभणी-हिंगोली आणि छत्रपती संभाजीनगर-जालना या मतदारसंघांतही प्रतिष्ठेच्या लढती रंगणार आहेत.
दरम्यान, रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार बाळ माने यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिकेत तटकरे बिनविरोध विजयी झाले. पुण्यात राष्ट्रवादीचे विक्रम काकडे, तर ठाण्यात शिवसेनेचे रवींद्र फाटक यांचाही बिनविरोध विजय निश्चित झाला.
राज्यातील स्थानिक स्वराज संस्था मतदारसंघातील या निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यातील राजकीय ताकद आणि स्थानिक पातळीवरील समीकरणांची खरी परीक्षा पाहायला मिळणार आहे. विशेषतः नाशिक, जळगाव, सांगली-सातारा आणि नांदेड येथील लढतींकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
बिनविरोध विजयी उमेदवार
| मतदारसंघ | विजयी उमेदवार | पक्ष |
|---|---|---|
| वर्धा-गडचिरोली-चंद्रपूर | अरुण लखाणी | भाजप |
| पुणे | विक्रम काकडे | राष्ट्रवादी काँग्रेस |
| ठाणे | रवींद्र फाटक | शिवसेना |
| रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग | अनिकेत तटकरे | राष्ट्रवादी काँग्रेस |
| यवतमाळ | दुष्यंत चतुर्वेदी | शिवसेना |
राज्यातील 12 मतदारसंघांतील प्रमुख लढती
| मतदारसंघ | उमेदवार 1 | उमेदवार 2 | उमेदवार 3 |
|---|---|---|---|
| सोलापूर | राजेंद्र राऊत (भाजप) | वसंतराव देशमुख (राष्ट्रवादी शरद पवार) | – |
| अहिल्यानगर | प्राजक्त तनपुरे (भाजप) | दत्तात्रय पानसरे (अपक्ष) | – |
| जळगाव | नंदकिशोर महाजन (भाजप) | शरद तायडे (ठाकरे सेना) | रेश्मा काळे (शिंदे सेना बंडखोर) |
| सांगली-सातारा | धैर्यशील कदम (भाजप) | अभयसिंह जगताप (राष्ट्रवादी शरद पवार) | किशोर धुमाळ (अपक्ष) |
| नांदेड | अमर राजूरकर (भाजप) | रामदास पाटील (काँग्रेस) | – |
| भंडारा-गोंदिया | नरेश ईश्वरकर (काँग्रेस पाठिंबा) | अविनाश ब्राह्मणकर (भाजप) | – |
| नाशिक | गोकुळ गीते (अपक्ष) | नरेंद्र दराडे (शिवसेना) | – |
| अमरावती | हर्षदीप देशमुख (काँग्रेस) | प्रवीण पोटे (भाजप) | निलेश विश्वकर्मा (वंचित) |
| धाराशिव-लातूर-बीड | बसवराज पाटील (भाजप) | महेश देशमुख (काँग्रेस) | – |
| परभणी-हिंगोली | सईद खान (शिवसेना) | डॉ. विवेक नावंदर (ठाकरे सेना) | सुशील देशमुख (अपक्ष) |
| छत्रपती संभाजीनगर-जालना | सुहास शिरसाट (भाजप) | गणेश लोखंडे (ठाकरे सेना) | – |
| नागपूर (पोटनिवडणूक) | डॉ. राजीव पोतदार (भाजप) | अतुल लोंढे (काँग्रेस) | – |