उल्हासनगर | प्रतिनिधी
उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती रुग्णालयातील आरोग्य सुविधांवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. NICU (नवजात शिशु अतिदक्षता विभाग) आणि बालकांसाठी विशेष व्हेंटिलेटर सुविधा उपलब्ध नसल्यामुळे अत्यंत कमी वजनाच्या नवजात चिमुकलीचा उपचाराअभावी मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.
या घटनेमुळे उल्हासनगरसह परिसरातील नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली असून आरोग्य व्यवस्थेवर तीव्र टीका होत आहे. मात्र, रुग्णालय प्रशासनाने हे सर्व आरोप फेटाळून लावत बाळाची प्रकृती अत्यंत गंभीर होती आणि वैद्यकीयदृष्ट्या तिला वाचवणे अशक्य असल्याचा दावा केला आहे.
प्राण वाचवण्यासाठी वडिलांची धावपळ
उल्हासनगरमधील नाजीरा धिरेंद्र राजभर यांनी एका खासगी रुग्णालयात अत्यंत कमी वजनाच्या कन्येला जन्म दिला. जन्मानंतर बाळाची प्रकृती चिंताजनक असल्याने तिला तातडीने NICU आणि बालकांसाठी विशेष व्हेंटिलेटरची गरज होती.
नातेवाईकांनी तिला उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात दाखल केले. मात्र आवश्यक सुविधा उपलब्ध नसल्याने बाळाच्या वडिलांनी मुंबईतील वाडिया, सायन आणि कळवा रुग्णालयात बेड मिळवण्यासाठी धावपळ केली. वेळेत उपचार आणि सुविधा न मिळाल्याने अखेर चिमुकलीची मृत्यूशी सुरू असलेली झुंज अपयशी ठरली.
भाजप नगरसेविकेची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार
या घटनेनंतर भाजप नगरसेविका सुचित्रा सिंह यांनी थेट मुख्यमंत्री आणि आरोग्य विभागाकडे तक्रार केली आहे.
शहापूर, मुरबाड, कर्जत, बदलापूर आणि उल्हासनगर परिसरातील हजारो गरीब व मध्यमवर्गीय नागरिकांसाठी हे रुग्णालय महत्त्वाचे केंद्र असूनही येथे अत्यावश्यक बालरोग सुविधा नसल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली.
रुग्णालयात तातडीने आधुनिक NICU विभाग आणि बालकांसाठी स्वतंत्र व्हेंटिलेटर सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणीही त्यांनी केली.
रुग्णालय प्रशासनाचा खुलासा
मध्यवर्ती रुग्णालय प्रशासनाने सांगितले की, 29 मे रोजी रात्री बाळाला गंभीर अवस्थेत रुग्णालयात आणण्यात आले होते. बालरोगतज्ज्ञांनी तात्काळ उपचार सुरू करत उपलब्ध असलेल्या CPAP यंत्रणेवर उपचार केले.
प्रशासनाच्या माहितीनुसार, अवघ्या 500 ग्रॅम वजनाचे आणि अकाली जन्मलेले हे बाळ अत्यंत गंभीर अवस्थेत होते. विशेष NICU व्हेंटिलेटरसाठी मुंबईच्या वाडिया रुग्णालयात रेफर करण्यात आले होते. मात्र तेथे बेड उपलब्ध नसल्याने दोन दिवस स्थानिक स्तरावर सर्वतोपरी प्रयत्न करण्यात आले.
डॉक्टरांनी बाळाला वाचवण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न केले असून रुग्णालयावर केलेले आरोप वस्तुस्थितीशी विसंगत असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.
नागरिकांमध्ये संताप
या घटनेनंतर उल्हासनगर आणि परिसरातील नागरिकांनी सरकारी रुग्णालयांमधील अपुऱ्या आरोग्य सुविधांबाबत संताप व्यक्त केला आहे. विशेषतः नवजात बालकांसाठी आवश्यक असलेल्या अत्याधुनिक यंत्रणा आणि उपचार सुविधा उपलब्ध करण्याची मागणी जोर धरत आहे.
दरम्यान, या प्रकरणाची सखोल चौकशी करून जबाबदारी निश्चित करावी आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.