Ekanth-Shinde

मुंबई | प्रतिनिधी

महायुतीतील विधान परिषद निवडणुकीच्या जागावाटपाचा तिढा अखेर सुटला असून कोकण विधान परिषद मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला गेला आहे. यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोकणातील शिवसेना आमदार आणि पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन युतीधर्म पाळण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अनिकेत तटकरे यांच्या उमेदवारीला शिवसेनेचा पाठिंबा मिळणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

शिंदे यांनी घेतलेल्या बैठकीला आमदार महेंद्र दळवी, महेंद्र थोरवे, निलेश राणे, विकास गोगावले तसेच मंत्री भरत गोगावले उपस्थित होते. कोकणची जागा राष्ट्रवादीच्या वाट्याला गेल्याने स्थानिक पातळीवरील नाराजी बाजूला ठेवून महायुतीचा उमेदवार विजयी करण्यासाठी सर्वांनी एकत्रित काम करावे, असे निर्देश बैठकीत देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

दरम्यान, कोकणची जागा राष्ट्रवादीला मिळाल्यानंतरही रायगडच्या पालकमंत्रिपदाबाबत कोणतीही स्पष्टता समोर आलेली नाही. त्यामुळे या मुद्द्यावर राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला जाहीर

विधान परिषदेच्या 17 जागांसाठी महायुतीने अखेर जागावाटप निश्चित केले आहे. त्यानुसार भाजप 11 जागा, शिवसेना 4 जागा आणि राष्ट्रवादी काँग्रेस 2 जागा लढवणार आहे. सुरुवातीला राष्ट्रवादीला केवळ एक जागा मिळेल, अशी चर्चा होती. मात्र अंतिम वाटपात पक्षाच्या वाट्याला पुणे आणि कोकण या दोन महत्त्वाच्या जागा आल्या आहेत.

शिवसेना किमान सात जागांसाठी आग्रही होती. यासाठी पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी दिल्लीपर्यंत प्रयत्न केल्याचे बोलले जात होते. मात्र अखेरीस पक्षाला ठाणे, नाशिक, परभणी आणि यवतमाळ या चार जागांवर समाधान मानावे लागले.

अनिकेत तटकरे उद्या अर्ज भरणार

कोकणची जागा राष्ट्रवादीच्या वाट्याला गेल्यानंतर खासदार सुनील तटकरे यांचे सुपुत्र अनिकेत तटकरे यांनी उमेदवारी अर्ज घेतला असून ते सोमवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यांच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्यावेळी शिवसेना आमदार उपस्थित राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मात्र या जागेवर शिवसेनेनेही दावा केला होता. शिवसेना आमदार महेंद्र दळवी यांच्या कन्या जुईली दळवी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे त्या अर्ज मागे घेणार का, याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

याशिवाय मंत्री भरत गोगावले यांचे पुत्रही या जागेसाठी इच्छुक असल्याची चर्चा होती. मात्र, “एकनाथ शिंदे यांच्या निर्णयापुढे आम्ही जाणार नाही,” अशी भूमिका भरत गोगावले यांनी स्पष्ट केली आहे. दुसरीकडे, सुनील तटकरे यांनी एकनाथ शिंदे यांचे कौतुक करत त्यांना “दिलखुलास नेतृत्व” असे संबोधले.

Leave a Reply

Discover more from ANN – Accurate News Network

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading