नाशिक | प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) नाशिक विभागात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. महिला सहकाऱ्याचा पाठलाग करून तिच्याशी अश्लील संवाद साधत विनयभंग केल्याप्रकरणी एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याविरुद्ध पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे एसटी महामंडळाच्या वर्तुळात खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विजय विश्वनाथ निकम (वय 45, रा. ओझर, नाशिक) असे संशयित अधिकाऱ्याचे नाव आहे. ते एसटी महामंडळाच्या शिंगाडा तलाव येथील आगार क्रमांक 1 मध्ये सहायक वाहतूक अधीक्षक म्हणून कार्यरत आहेत.
महिला कर्मचाऱ्याचा पाठलाग केल्याचा आरोप
पीडित 36 वर्षीय विवाहित महिला कर्मचारी पंचवटी परिसरातील बायपास बुकिंग कार्यालय आणि भरारी पथकात कार्यरत आहे. एप्रिल 2026 ते 6 मे 2026 या कालावधीत संशयित अधिकाऱ्याने वारंवार तिचा पाठलाग करून त्रास दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.
तक्रारीनुसार, 6 मे रोजी सायंकाळी कर्तव्यावर असताना संशयित अधिकारी तेथे आले आणि महिलेला गाडीत बसून फिरायला जाण्याचा आग्रह केला. महिलेने स्पष्ट नकार दिल्यानंतरही त्यांनी तिचा पाठलाग सुरू ठेवला.
जबरदस्तीने चॉकलेट देण्याचा प्रयत्न
महिलेने नकार दिल्यानंतर संशयिताने गाडीतून उतरून तिला जबरदस्तीने चॉकलेट देण्याचा प्रयत्न केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. तसेच तिचा हात पकडून प्रेमाची मागणी करत अश्लील स्वरूपाचे संवाद साधल्याचा आरोप आहे.
या प्रकारामुळे महिलेला मानसिक त्रास आणि लज्जास्पद परिस्थितीचा सामना करावा लागल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
गुन्हा दाखल होताच अधिकारी फरार
महिला कर्मचाऱ्याने अखेर पंचवटी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार संशयिताविरुद्ध विनयभंग आणि महिला छळासंदर्भातील कलमान्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
गुन्हा दाखल झाल्याची माहिती मिळताच संशयित अधिकारी कार्यालयात गैरहजर असल्याचे समोर आले असून, ते सध्या फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
पोलिस तपास सुरू
या प्रकरणाचा पुढील तपास पंचवटी पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक कैलास जाधव करत असून, संशयिताचा शोध घेण्यासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत. या घटनेमुळे एसटी महामंडळातील महिला कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.