17801150940047650

अहमदाबाद | प्रतिनिधी

आयपीएल 2026 स्पर्धेच्या अंतिम फेरीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) आणि गुजरात टायटन्स (GT) हे दोन बलाढ्य संघ आमनेसामने येणार आहेत. 31 मे रोजी अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा महामुकाबला रंगणार असून क्रिकेटप्रेमींमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.

दोन्ही संघांनी साखळी फेरीत दमदार कामगिरी करत 14 पैकी 9 सामने जिंकले आणि प्रत्येकी 18 गुणांची कमाई केली. मात्र, उत्तम नेट रनरेटच्या जोरावर आरसीबीने गुणतालिकेत वरचं स्थान पटकावलं.

क्वालिफायर-1 मध्ये आरसीबीने गुजरात टायटन्सचा पराभव करत थेट अंतिम फेरी गाठली. दुसरीकडे, गुजरातने क्वालिफायर-2 मध्ये राजस्थान रॉयल्सवर मात करत फायनलचे तिकीट निश्चित केले.

गुजरात टायटन्सची दमदार कामगिरी

2022 मध्ये आयपीएलमध्ये पदार्पण केल्यानंतर गुजरात टायटन्सने सातत्याने उत्कृष्ट खेळी केली आहे. संघाने आतापर्यंत 76 सामने खेळले असून त्यापैकी 47 सामन्यांत विजय मिळवला आहे. 61.8 टक्के विजयाची नोंद असलेल्या गुजरातने पाचपैकी चार हंगामांत प्लेऑफ गाठले असून तिसऱ्यांदा अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.

आरसीबीचीही प्रभावी वाटचाल

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनेही मागील काही वर्षांत सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे. आरसीबीने 76 पैकी 44 सामने जिंकले असून त्यांची विजयाची टक्केवारी 57.8 आहे. संघाने पाचपैकी चार हंगामांत प्लेऑफमध्ये स्थान मिळवले असून सलग दुसऱ्यांदा अंतिम फेरी गाठली आहे.

कोण होणार आयपीएल 2026 चा बादशाह?

मागील पाच वर्षांतील आकडेवारी पाहता दोन्ही संघ आयपीएलमधील सर्वाधिक यशस्वी संघांमध्ये गणले जातात. त्यामुळे अहमदाबादच्या मैदानावर होणारी अंतिम लढत अत्यंत चुरशीची होण्याची शक्यता आहे. आता जेतेपदाची ट्रॉफी कोणाच्या हाती जाणार, याकडे संपूर्ण क्रिकेटविश्वाचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Discover more from ANN – Accurate News Network

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading