पुणे : पुणे जिल्ह्यात पुन्हा एकदा बिबट्याच्या मुक्तसंचाराने नागरिकांची झोप उडाली आहे. राजगड तालुक्यातील पानशेत खोऱ्यात रात्रीच्या वेळी दबक्या पावलांनी फिरणारा बिबट्या स्थानिकांच्या कॅमेऱ्यात कैद झाला असून, हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कुरवटी आंबेगाव खुर्द परिसरातील नागरीवस्ती जवळील रस्त्यावर रात्रीच्या सुमारास अचानक बिबट्या दिसला. रस्त्याच्या कडेला शांतपणे फिरणाऱ्या या बिबट्याला पाहून नागरिकांचा थरकाप उडाला. काही स्थानिकांनी धाडस करून मोबाईलमध्ये त्याचा व्हिडीओ शूट केला.
अन्न-पाण्याच्या शोधात बिबटे लोकवस्तीत
सध्या राज्यात वाढलेल्या उष्णतेमुळे जंगलातील अनेक पाणवठे कोरडे पडले आहेत. त्यामुळे बिबटे अन्न आणि पाण्याच्या शोधात जंगल सोडून लोकवस्तीच्या दिशेने येत असल्याचे वन विभागाकडून सांगितले जात आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी त्यांचा वावर अधिक वाढत असल्याने ग्रामस्थांमध्ये चिंता वाढली आहे.
https://x.com/i/status/2060319942227247490
वनविभागाचा सतर्कतेचा इशारा
घटनेनंतर वनविभागाने परिसरात गस्त वाढवली असून नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन केले आहे. जंगल परिसरात पर्यटनासाठी जाणे, रात्री गुरे चारणे किंवा एकट्याने शेतात जाणे टाळावे, असे निर्देश देण्यात आले आहेत.
तसेच लहान मुलांना रात्री घराबाहेर एकटे सोडू नये आणि पाळीव जनावरे सुरक्षित ठिकाणी बांधावीत, असेही सांगण्यात आले आहे. बिबट्या दिसल्यास त्याला डिवचण्याचा प्रयत्न करू नये, तर आरडाओरडा करून इतरांना सतर्क करावे, असे आवाहन वनविभागाने केले आहे.
दरम्यान, पानशेत खोऱ्यातील हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर होत असून, नागरिकांकडून वनविभागाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली जात आहे.

Leave a Reply