नाशिकमध्ये प्रेमसंबंधांचा थरारक शेवट! विवाहित प्रेयसीनेच प्रियकराचा रचला कट?

नाशिक : प्रेमसंबंध, कौटुंबिक विरोध आणि संशयाच्या भोवऱ्यात अडकलेल्या एका नात्याचा नाशिकमध्ये धक्कादायक शेवट झाला आहे. आपल्यापेक्षा सहा वर्षांनी लहान असलेल्या तरुणासोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या विवाहित महिलेनेच प्रियकराच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप समोर आला असून, या घटनेने संपूर्ण शहर हादरले आहे.

अनेक वर्षांपासून सुरू होते संबंध

मिळालेल्या माहितीनुसार, 32 वर्षीय सोनाली राजेंद्र गायकवाड हिचे 26 वर्षीय अमोल पंढरीनाथ दांडगे याच्यासोबत अनेक वर्षांपासून प्रेमसंबंध होते. या नात्याला अमोलच्या कुटुंबीयांचा विरोध होता. मात्र, विरोध झुगारून अमोलने स्वतःचे घर सोडले आणि तो सोनालीसोबत नवनाथ नगर परिसरातील साळवे चाळीत राहत होता.

संशयातून वाढला वाद

दरम्यान, अमोलचे दुसऱ्या महिलेसोबतही संबंध असल्याचा संशय सोनालीला आला. यावरून दोघांमध्ये वारंवार वाद होत असल्याची माहिती समोर आली आहे. याच रागातून सोनालीने अमोलचा कायमचा काटा काढण्याचा कट रचल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे.

मैत्रीण आणि जावेलाही घेतले सोबत

अमोल शरीराने मजबूत असल्याने सोनालीने या कटात तिची जाव मंदाबाई गायकवाड आणि मैत्रीण वैशाली खरात यांना सामील करून घेतल्याचे तपासात समोर आले आहे. 25 मेच्या रात्री तिघींनी मिळून अमोलचा गळा आवळून खून केल्याचा आरोप आहे.

घटनेनंतर अमोलला चक्कर येऊन पडल्याचा बनाव करण्यात आला. शेजाऱ्यांच्या मदतीने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तपासणीदरम्यान गळ्यावरच्या खुणा पाहून संशय व्यक्त केला. शवविच्छेदन अहवालात हत्या झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर प्रकरणाने वेगळे वळण घेतले.

पोलिसांकडून तपास वेगात

या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी सोनालीला ताब्यात घेतले आहे. अमोलच्या भावाने दिलेल्या तक्रारीनुसार पुढील तपास सुरू आहे. हत्या प्रकरणामागे आर्थिक वादाचाही कोन असल्याची चर्चा सुरू आहे.

या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून, प्रेमसंबंधाच्या गुंत्यातून घडलेल्या या हत्येने अनेकांना धक्का बसला आहे.

Discover more from ANN – Accurate News Network

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading