उड्डाणपुलासाठी अतिक्रमण हटवताना वाद; व्हायरल व्हिडिओनंतर राजकारण तापले, अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी
कल्याण, प्रतिनिधी : कल्याणमधील प्रस्तावित उड्डाणपुलाच्या कामासाठी करण्यात आलेल्या अतिक्रमण हटाव कारवाईवरून निर्माण झालेला वाद आता राज्याच्या सीमा ओलांडून थेट दिल्लीपर्यंत पोहोचण्याची चिन्हे दिसत आहेत. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमुळे हे प्रकरण चांगलेच चर्चेत आले असून, काँग्रेसने या मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेतल्याने राजकीय वातावरण तापले आहे.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेकडून (केडीएमसी) प्रेम ऑटो ते विठ्ठलवाडी दरम्यान प्रस्तावित चार पदरी उड्डाणपुलाच्या कामासाठी अतिक्रमण हटवण्याची मोहीम राबविण्यात येत आहे. या अंतर्गत कल्याण पश्चिमेतील वालधुनी परिसरातील बुद्धभूमी फाउंडेशनच्या जागेवर कारवाई करण्यात आली.
कारवाईदरम्यान काही बुद्धमूर्ती आणि धार्मिक साहित्य हटवताना निष्काळजीपणा झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. यासंदर्भातील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर बौद्ध समाजात संतापाची लाट उसळली. व्हिडिओमध्ये काही बौद्ध भिक्षू कारवाईला विरोध करताना दिसत असल्याने या प्रकरणाची तीव्रता वाढली आहे.
दरम्यान, केडीएमसी प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावत कारवाई नियमानुसार झाल्याचा दावा केला आहे. कारवाईपूर्वी बुद्धभूमी फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली होती आणि भविष्यातही संवाद सुरू राहणार असल्याचे पालिका आयुक्तांनी स्पष्ट केले आहे. या संदर्भात 5 जून रोजी महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे.
या वादात आता काँग्रेसने उडी घेतली आहे. काँग्रेसच्या केडीएमसी गटनेत्या कांचन कुलकर्णी यांनी पालिका आयुक्तांना निवेदन देत या घटनेचा निषेध नोंदवला आहे. विकासकामांना विरोध नसला तरी धार्मिक भावना दुखावल्या जाणार नाहीत याची काळजी घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच या प्रकरणाला जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली आहे.
विशेष म्हणजे 6 जून रोजी दिल्लीत होणाऱ्या काँग्रेसच्या प्रदेश पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत हा विषय विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासमोर मांडला जाणार असल्याची माहिती कांचन कुलकर्णी यांनी दिली आहे. त्यामुळे या वादाला राष्ट्रीय स्तरावरील राजकीय परिमाण मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
दरम्यान, सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास घाणेकर यांनी केलेल्या दाव्यामुळे प्रकरणाला आणखी वेगळे वळण मिळाले आहे. बुद्धभूमी फाउंडेशनची जागा अनधिकृतपणे केडीएमसीच्या नावावर करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे. मूळ मालकाने जागा विकलेली नसतानाही विकासकाने ती विकल्याचे दाखवून टीडीआरचा लाभ घेतल्याचा दावा त्यांनी केला आहे.
या आरोपांमुळे पालिकेच्या भूमापन आणि नगररचना विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, हा वाद आता केवळ अतिक्रमण हटाव कारवाईपुरता मर्यादित न राहता सामाजिक, धार्मिक आणि राजकीय स्वरूप धारण करताना दिसत आहे.
ANN – Accurate News Network
🟥 Truth First | Fast & Accurate Reporting
🌍 महाराष्ट्र तसेच भारत आणि जगभरातील ताज्या घडामोडी आता एका विश्वासार्ह प्लॅटफॉर्मवर.
ANN – Accurate News Network घेऊन येत आहे:
✔ Breaking News
✔ Political Updates
✔ Crime Reports
✔ Social & Viral Stories
✔ Entertainment & Sports
✔ Ground Reporting
✔ Live Updates