शेअर मार्केटमध्ये भरघोस परताव्याचे आमिष; नाशिकमध्ये कोट्यवधींची फसवणूक, दोन भाऊ रायगडमधून अटकेत
नाशिक | प्रतिनिधी
शेअर मार्केटमध्ये दरमहा ४ ते ६ टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवत तसेच प्लास्टिक कंपनीत भागीदारी देण्याचे आश्वासन देऊन नाशिकमधील ४० हून अधिक गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी रायगड जिल्ह्यातून दोन भावांना अटक करण्यात आली असून त्यांच्या आई-वडिलांचा पोलीस शोध घेत आहेत.
यश सुरेश जानवलकर, युवराज सुरेश जानवलकर, सुरेश बाबुराव जानवलकर आणि संगीता सुरेश जानवलकर या कुटुंबाने ‘फ्युचर स्टॉक मार्केट अनॅलिसिस’ नावाची गुंतवणूक संस्था सुरू करून अनेकांना जाळ्यात ओढल्याचा आरोप आहे. एप्रिल २०२३ ते नोव्हेंबर २०२५ या कालावधीत त्यांनी शेअर मार्केटमधून भरघोस नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवत लाखो रुपयांची गुंतवणूक करून घेतली.
संशयितांनी केवळ शेअर मार्केटच नव्हे तर सिन्नर येथील माळेगाव एमआयडीसी आणि अंबड परिसरातील प्लास्टिक बॉटल उत्पादन कंपनीत भागीदारी देण्याचे आश्वासनही गुंतवणूकदारांना दिले. या आमिषाला बळी पडून वकील, शासकीय कर्मचारी आणि इतर सुशिक्षित नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर पैसे गुंतवले. एका फिर्यादीची तब्बल ६० लाख रुपयांची फसवणूक झाल्याची माहिती तपासात समोर आली आहे.
गुंतवणूकदारांनी पैशांसाठी तगादा लावल्यानंतर संशयितांनी नाशिकमधील स्वतःचे राहते घरही दोन ते तीन वेगवेगळ्या व्यक्तींना विकल्याचा आरोप आहे. त्यानंतर संपूर्ण कुटुंब नाशिकमधून फरार झाले होते.
या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक आणि उपायुक्त चंद्रकांत गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा व आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने तांत्रिक तपासाद्वारे संशयितांचा शोध घेतला.
रायगड जिल्ह्यातील खालापूर, नेरळ आणि खोपोली परिसरात संशयित लपून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी कारवाई करत युवराज जानवलकर (वय ३२) आणि यश जानवलकर (वय ३०) यांना अटक केली. न्यायालयाने दोघांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
दरम्यान, या प्रकरणातील मुख्य संशयित सुरेश जानवलकर आणि संगीता जानवलकर हे अद्याप फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. फसवणुकीचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत असून नागरिकांनी पुढे येऊन तक्रार नोंदवावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
ANN – Accurate News Network
🟥 Truth First | Fast & Accurate Reporting
🌍 महाराष्ट्र तसेच भारत आणि जगभरातील ताज्या घडामोडी आता एका विश्वासार्ह प्लॅटफॉर्मवर.
ANN – Accurate News Network घेऊन येत आहे:
✔ Breaking News
✔ Political Updates
✔ Crime Reports
✔ Social & Viral Stories
✔ Entertainment & Sports
✔ Ground Reporting
✔ Live Updates